रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप
चिंभळ्यातील हरित परिवार बहुउद्देशीय सेवा संस्था स्तुत्य उपक्रम
चिंभळा(प्रतिनिधी) सध्या संपूर्ण देशात कोरोना रोगाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी महागडी फळे व ड्रायफ्रुट्स खाणे प्रत्येकालाच जमणार नाही. आर्सेनिकम अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांनी रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे गावातील लोकांना या गोळ्या मोफत देण्यासाठी चिंभळा (ता.श्रीगोंदा) हरित परिवार बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सदस्यांनी गावातीलच मित्र परिवारांना मदतीचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारची सक्ती न करताही फोन पे च्या माध्यमातून आर्थिक मदत जमा केली. डॉ. सचिन जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२०एप्रिल २०२० रोजी आर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्यांची खरेदी करण्यात आली. गोळ्यांच्या सेवनाबाबत नागरिकांना व्हाट्सएपच्या माध्यमातून व फोनद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर २१०० छोट्या बॉटलमधून ७००० लोकसंखेला गोळ्यांचे वाटप आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी करण्यात आले. हे काम करत असताना सोशल डिस्टन्सचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. तसेच हरित परिवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी गावातील किराणा दुकाने, मेडिकल, हॉस्पिटल, रेशन दुकान यांच्या समोर सोशल डिस्टन्स साठी ठराविक अंतरावर गोल आखून दिले.
सदरील उपक्रम राबविण्यासाठी सचिन गायकवाड ,अमोल गायकवाड, अजित गायकवाड, संतोष जगताप, सुनील गायकवाड,दीपक गायकवाड, राजेंद्र मूर्तमोडे, हरून हवलदार , गणेश आढागळे यांच्यासह हरीत परिवारातील स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. आपत्ती निवारणासाठी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.