बेलवंडी(प्रतिनिधी) देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत असलेल्या प्रादुर्भाव लक्षात घेता आणि कालच केंद्रीय गृह मंत्रालय यांनी बाहेरील राज्यातील, शहरातील विद्यार्थी, मजूर, भाविक, पर्यटक यांना आपल्या राज्यात, गावात जाण्यास मार्गदर्शक सूचना प्रसारित केलेल्या आहेत. बाहेरील शहरातून किंवा राज्यातून परवानगी घेऊन आलेल्या व्यक्तींनाच यापुढे गावात परवानगी मिळणार आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी बाहेरील राज्यातून किंवा शहारातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याची तपासणी करून गावातच इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करावे असा स्पष्ट आदेश सर्व ग्रामपंचायतींना काल २९ एप्रिल रोजी दिला आहे.
बाहेरील राज्यात अडकलेले विद्यार्थी, कामगार, पर्यटक आणि इतर व्यक्ती यांनां आपल्या राज्यात, गावात जाण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संबंधित राज्यांनी नियमांचे पालन करून निर्णय घ्यायचा आहे. परवानगी नसताना अनधिकृत रित्या बाहेरील जिल्हा, राज्यातून अनेक मित्र, नातेवाईक गावात येत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे या गंभीर बाबीवर उपाय म्हणून हा आदेश जाहीर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्यांच्या सूचना येण्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार गावपातळीवर कोरोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवक सदस्य असणार असून पोलीस पाटील हे सदस्य सचिव असणार आहेत. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीने परवानगी घेतली असेल तरच आशा व्यक्तींची माहिती तहसीलदार किंवा घटना व्यवस्थापक यांना त्वरित द्यायची आहे आणि त्यांनंतरच त्या व्यक्तीला गावात प्रवेश द्यायचा आहे. तसेच या व्यक्तीची रजिस्टर मध्ये नोंद सदस्य सचिव यांनी ठेवायची आहे.
बाहेरून आलेल्या या व्यक्तींची आरोग्य विभागाने तात्काळ आरोग्य तपासणी करायची आहे. या तपासणी नंतर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आदी ठिकाणी करायची आहे. या सर्व ठिकाणी राहण्याची तसेच इतर व्यवस्था या ग्रामसुरक्षा समितीने करायची आहेत असे आदेश जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिले आहेत.