'घोड'चा कोणताही लाभार्थी चालु आवर्तनात पाण्यापासून वंचित राहणार नाही
संयम व समन्वयातून भरणे उरकण्याचे राजेंद्र नागवडेंचे आवाहन
श्रीगोंदा (प्रतिनिधी) - 'घोड'च्या डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरु आहे.टेलकडील सिंचन पूर्ण झाले आहे. चालू आवर्तनाचे पाणी सध्या तालुक्यात सुरु असून शेतकरी पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.'घोड'च्या सध्या सुरु असलेल्या आवर्तनात प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला 'घोड'चे पाणी मिळेल.या आवर्तनात पाण्यापासून कोणीही शेतकरी वंचित रहाणार नाही अशी ग्वाही 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.दरम्यान धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहाता पुढील आवर्तनाबाबत शाश्वती नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी संयम व समन्वयातून सर्वांची भरणे उरकावीत, असे आवाहन यांनी केले आहे.
यासंदर्भात नागवडे यांनी म्हटले आहे की, 'घोड'च्या लाभक्षेत्रातील टेलकडील कर्जत तालुक्यातील सिंचन पूर्ण झाले असून श्रीगोंदा तालुक्यातील सिंचन सुरु करणेत आले आहे. 'घोड'च्या आवर्तनात सुरुवातीला अडचणी आल्या. परंतु, आता घोडचे आवर्तन सुरळीतपणे सुरू आहे. तालुक्यातील सर्व लाभार्थींचे भरणे कटाक्षाने करण्याबाबत आपण जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली असून सर्व शेतक-यांचे भरणे होईल असा विश्वास अधिका-यांनी दिला आहे असे सांगून ते म्हणाले की, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आवर्तनाच्या नियोजनात जलसंपदा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार सर्व भरणे होणारच आहे.शेतक-यांनी घाई न करता जलसंपदा विभागाच्या नियोजनात हस्तक्षेप टाळावा. पाण्याचा काटकसरीने वापर करुन भरणे करावे व पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी संयम आणि समन्वय राखून सगळ्यांची भरणे उरकावीत.