श्रीगोंदा तालुक्यात दररोज दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी
श्रीगोंदा(प्रतिनिधी) सगळ्यांना मदत जाहीर होते पण व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना कोणतीही मदत दिली जात नाही. आज काही दुकानदारांची अशी अवस्था आहे की त्यांना दुकान उघडण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात ज्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली आहे त्यांना दररोज दुकाने उघडू द्यावीत अशी मागणी श्रीगोंदा तालुका व्यापारी असोसिएशन ने श्रीगोंदा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जागतिक आरोग्य संघटना म्हणत आहे की कोरोना सोबत जगायला शिका. कोरोना हा प्रदीर्घ काळ चालणारी रोगाची साथ आहे. तर मग दुकानदारांनी अजून किती दिवस, किती महिने दुकान बंद ठेवायचे ? या दुकानदारांना तात्काळ राज्य शासनाने मदत करावी अन्यथा दररोज दुकाने उघडायला परवानगी द्यावी. प्रत्येक दुकानदाराला आणि व्यक्तीला आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी आहे. त्याप्रमाणे काळजी घेऊन आणि सामाजिक अंतर ठेवून या दुकानदारांनी दुकाने सुरू करण्यास काहीच अडचन नाही. राज्य सरकारने मागेच सांगितले आहे की स्थानिक प्रशासनाने मनानेच वेगळे आदेश काढू नयेत. पण स्थानिक प्रशासन रोज वेगळे आदेश काढत आहेत. जिल्हाधिकारी यांनी दुकान चालवण्याची परवानगी दिली आहे तरी स्थानिक प्रशासन व्हाट्सऍप च्या माध्यमातून कोणतेही अधिकृत सही, शिक्का, लेटरहेड नसलेले आदेश जनता कर्फ्यु, उद्या अमुक दुकाने बंद, कुणी आठवड्यात दोन दिवस दुकान चालू राहणार असे आदेश काढत आहेत. लोकांनी नेमके ऐकावे कोणाचे ? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. प्रशासनाला एकच विनंती आहे की आदेश एकदाच सांगा पण तो राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला धरून असावा. जिल्ह्यात सगळीकडे दुकाने सुरू असताना श्रीगोंदा तालुक्यात वेगळेच आदेश स्थानिक प्रशासन ते सुद्धा कुठलेही लेखी अधिकृत आदेश न देता फक्त व्हाट्सअप्प वर देत आहेत. प्रशासनाने यावर नक्की विचार करावा.
जे दुकानदार आदेश पाळत नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी त्यांना आधी संधी द्यावी आणि मगच कारवाई करावी. याबाबत अनेक व्यापाऱ्यांनी साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य कडे प्रतिक्रिया देताना सांगितले की प्रशासन मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानाला पोलीस संरक्षण देऊन चालू करत आहे आणि गरिबांना दुकानदारांना दुकाने बंद ठेवायला सांगत आहेत. अनेक दुकानदार यांना मागील २ महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने दुकान सुरू करता आले नाहीत. आता दुकान कुठे तरी सुरू होतील या एकमेव आशा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जागृत झाली असताना स्थानिक प्रशासनाने आठवड्यातील दोन दिवस दुकाने चालू ठेवण्याचा आदेश व्हाट्सऍप द्वारे दिला आहे. या निर्णयाने दुकानदारांची उपासमार सुरू झाली आहे. याबाबत वादळी स्वातंत्र्य ने श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, म्हसे, भानगाव, पारगाव या गावातील दुकांदारांकडे माहिती घेतली असता केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणत आहे की बांधकाम क्षेत्र सुरू करा, नोंदणी कार्यालये सुरू करा पण त्यासाठी लागणारे बांधकाम माल पुरविणारे व्यापारी यांनी आठवड्यातून दोनच दिवस दुकान चालू ठेवा हा कसला नियम ? असा उद्विग्न सवाल केला आहे.
तसेच सगळ्यांनी प्रशासनाला आम्ही सहकार्य करत असून प्रशासनाने आमचा विचार करावा आणि दररोज दुकान चालू ठेवण्यास परवानगी द्यावी.प्रशासनाने आठवड्यातील एक दिवस दुकान बंद ठेवून इतर दिवशी दुकाने उघडायला परवानगी द्यावी अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे.