श्रीगोंदा,दि.२९(प्रतिनिधी) - तालुक्यातील विशेषतः कुकडी लाभक्षेत्रातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कुकडी व विसापूर कालव्यांचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याकडे केली असल्याची माहिती 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
याबाबत बोलताना नागवडे म्हणाले, मे महिना संपत आला असून जून महिना आला आहे.मात्र तरीही विसापूरच्या लाभधारकांना सतत मागणी करुनही आवर्तन मिळालेले नाही.येथील शेती व शेतकरी संकटात सापडला आहे.ऊभी पिके,फळबागा व चारा पिके पाण्याअभावी जळण्याची भिती वाटू लागली आहे.शेतक-यांच्या सहनशिलतेचा अंत न पहाता सध्या कुकडी व विसापूरचे आवर्तन सुटणे गरजेचे बनले आहे. लाभक्षेत्रातील पाणीपातळीत घट झाली असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापूर्वी विसापूर कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी आपण केली आहे. त्याचबरोबर डिंभे धरणात जवळपास तीन टीएमसी पाणीसाठा आहे.
डिंभे धरणातील पाणी येडगावमध्ये सोडून कुकडीचे देखील आवर्तन तातडीने सोडावे, कुकडीचे एक आवर्तन मिळाल्यास लाभक्षेत्रातील चारा पिके, फळबागा, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्या प्रश्न निर्माण होणार नाही. शिवाय पिकांनाही जिवदान मिळेल म्हणून उपलब्ध पाण्यातून तातडीने कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडून येथील शेतक-यांना न्याय द्यावा अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याकडे केल्याचे नागवडे यांनी सांगितले.