कोंडेगव्हाण प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित
बेलवंडी (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हान येथे मुंबईहुन आलेल्या एका व्यक्तीस कोरोना विषाणू ची लागण झालेली असून त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हान हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार सदर क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान करणे व सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार श्रीगोंदा तथा इनसिडेंट कमांडर श्रीगोंदा यांनी दिली आहे.
सुरुवातीला श्रीगोंदा कारखाना येथे आणि आता कोंडेगव्हाण येथे मुंबई येथून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
वरील क्षेत्रातील सर्व आस्थपना, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री आदी दि २ जून २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि १२ जून २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांची जबाबदारी नोडल प्रतिनिधी म्हणून आहे. या कालावधीमध्ये कोंडेगव्हान गावातील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा जसे दूध, किराणा,भाजीपाला, व इतर जीवनावश्यक वस्तू याबाबत नियोजन राम जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी यांचेकडे सनियंत्रण अधिकारी म्हणून असणार आहे. तसेच या प्रतिबंधित क्षेत्रासाठी पोलिस बंदोबस्त पोलीस निरीक्षक बेलवंडी यांच्यामार्फत असणार आहे
या कालावधीमध्ये प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती याना आपत्कालीन परिस्थितीत आत किंवा बाहेर जायचे असल्यास त्याचे अधिकार पोलिस निरीक्षक बेलवंडी याना असतील. सदरचे आदेश हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार देण्यात आले आहेत. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार श्रीगोंदा तथा इनसिडेंट कमांडर महेंद्र माळी यांनी केले आहे.