लिंपणगाव (प्रतिनिधी )श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रामध्ये पाणी टंचाईचे मोठे जलसंकट उभे राहिल्याने शेतकरी आता कुकडी आवर्तनाच्या भरवशावर न बसता स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी प्रत्येक जण कूपनलिका खोदण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत .दोन महिन्यापूर्वी कुकडीचे आवर्तन सुटले तेदेखील तब्बल 25 दिवस उशिराने कारण करमाळा कर्जत या तालुक्यातील भरणी उरकल्यानंतर श्रीगोंदा, पारनेर तालुक्याला न्याय मिळतो. जलसंपदा विभागाने मात्र यापूर्वीच टेल टू हेड असा फॉर्म्युला राबविल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात नेहमीच पिके जळाल्यानंतर पाणी सुटते. त्यामुळे आता कुकडीच्या आवर्तनावर अवलंबून न बसता आपणच आता आपले नशीब आजमावून आपल्या ग्रामदैवतला नतमस्तक होऊन कूपनलिका व विहिरी खोदणे याकडे कल दिसून येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कुकडी ची स्थापना झाल्यापासून आज पर्यंत उन्हाळी हंगामात एकाही वर्षी वेळेत रोटेशन सोडल्याचे आठवत नसल्याचे शेतकरी सांगतात आमच्या दोन पिढ्या गेल्या परंतु, कुकडी लाभक्षेत्रात मात्र पाणीवाटपाचे नियोजन होत नाही त्यामुळे आतापर्यंत या क्षेत्रात फक्त पावसाच्या धर्तीवरच पिके हाती लागली असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात पाणी उशाला अन कोरड घशाला अशी अवस्था श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात अनेक वर्षापासून दिसून येत असल्याचे शेतकरी सांगतात. कारण पुणे जिल्ह्यामध्ये सर्व धरणे असल्यामुळे प्रथम पुणे जिल्ह्यात तील उद्योग व शेतीला पाण्याचे प्राधान्य असा वर्षभर कार्यक्रम या जलसंपदा विभागाकडून राबवला जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. गेल्या दोन वर्षात दुष्काळ चालू वर्षी कोरोना संकट त्यामुळे शेतीसह मजुरी करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यावर मात्र मोठे धर्मसंकट उभे राहिल्याचे शेतकरी सांगतात. वास्तविक पाहता तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वीच कुकडी धरणाचे पाणी बारमाही पद्धतीने करण्याची आवश्यकता होती, मात्र जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात की, कुकडी लाभक्षेत्रात फक्त आठमाही धोरण पाणीवाटपाचे आहे .असे वारंवार सांगतात .परंतु आठमाही धोरणानुसार किती वेळा ? शेतकऱ्यांना आवर्तन सोडण्यात आलेत हे शहानिशा करून दाखवावेत असा सवाल कुकडी लाभ क्षेत्रांमधून व्यक्त केला जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यात घोड धरणाच्या पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात लाभ होतो त्याला क्षेत्रात मोठे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या लाभक्षेत्रात पाणीवाटपाचे वेळेवर व ठरल्याप्रमाणे आवर्तन सोडले जातात इकडे मात्र लाभक्षेत्रात पाणीवाटपाचे नियोजन ऐन उन्हाळी हंगामात जाणीवपुर्वक लांबणीवर पडतं आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. या लाभक्षेत्रात देखील मोठे क्षेत्र सिंचनाखाली असूनही नियोजनाअभावी व कुणाचाच वचक नसल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आवर्तन मिळत नाही. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. यासाठी आता शेतकऱ्यांनी कुकडीच्या भरवशावर न बसता कूपनलिका व विहिरी तसेच शेततळी निर्माण करून त्याद्वारे शेती सुधारण्याचा मानस हाती घेतल्याचे शेतकरी सांगतात. किती? दिवस आम्ही या आवर्तनाची वाट पहायची? किती वेळा आंदोलने करायची ?शासन दरबारी मात्र न्याय मिळत नाही. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनीच हा प्रश्न हाती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु शासन विरोधी लोकप्रतिनिधी असे समीकरण प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत होत असल्याने याप्रश्नी राजकीय राजकीय दृष्ट्या या प्रश्नाला वाचा फोडली जात नसल्याचे शेतकरी सांगतात.