लग्नामध्ये अनाठायी खर्च टाळून वाचनालयास देणगी
चिंभळा (प्रतिनिधी) अज्ञानाच्या दलदलीत ज्ञानाचा अंकुर फुलविणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानदेव  गायकवाड यांचे चिरंजीव विक्रम  व रामदास पंधरकर यांची कन्या मंगल यांचा विवाह कुताळ वस्ती, पिंपळगाव पिसा( ता.श्रीगोंदा) येथे दि. ११जून रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. शासनाच्या नियमानुसार व सामाजिक अंतराचे भान ठेवून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत विवाह झाला.

   या विवाहामध्ये अनाठायी होणारा खर्च टाळून ज्ञानदेव गायकवाड यांनी चिंभळे येथील हरित परिवार संचलित ज्ञानसागर वाचनालयास स्पर्धा परीक्षेची पुस्तके खरेदी करण्यासाठी अकरा हजार रुपये रोख देणगी दिली. हरित परिवाराने लग्न झालेल्या नव वरवधूच्या  हस्ते वृक्षलागवड करून दांपत्याचे स्वागत केले. ज्ञानदेव गायकवाड यांनी पाडलेल्या नवीन पायंड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.