चिंभळे येथील हरित परिवार बहुउद्देशीय सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
बेलवंडी (प्रतिनिधी) "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती" या संत तुकाराम महाराजांच्या अभंगात सतराव्या शतकात वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे. आज एकविसाव्या शतकात जगणारे आपण निसर्गाकडे दुर्लक्ष करत आहोत. याचाच परिणाम निसर्गाचा समतोल ढासळला आहे. हिरवी जंगले नष्ट होत जाऊन सिमेंटची जंगले तयार होत आहेत. पर्यावरण वाचवा म्हणून आंदोलने व निदर्शने करत बसण्यापेक्षा चिंभळा गावातील तरुण एकत्र येऊन त्यांनी गेल्यावर्षी हरित परिवार ही बहुउद्देशीय सेवा संस्था स्थापन केली.
त्याच्या माध्यमातून मागील वर्षी तरुणांनी स्वखर्चाने चारशे वेगवेगळ्या झाडांची रोपे खरेदी करून गावातील चार एकर जागेत त्याची लागवड केली. झाडांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तेथे कूपनलिका घेतली. भटक्या जनावरांपासून झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी त्या सर्व परिसराला तारेचे कुंपण केले. त्या झाडांना नियमितपणे पाणी व खत देण्याची व्यवस्था केली. सर्वांनी योग्य देखरेख केल्यामुळे आज तेथे सुंदर वनराई फुललेली आहे. यामध्ये चिंच,वड, पिंपळ, जांभूळ, पेरू, आंबा, अशोका, उंबर, लिंब, सीताफळ अशी विविध प्रकाराची झाडे आहेत. या झाडांच्या मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर हरित परिवार गावाच्या विकासासाठी करणार आहे.
हरित परिवाराच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबविले जातात. गावात वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्याचे काम देखील हरित परिवाराने हाती घेतलेले आहे. यामध्ये हरित परिवाराचे.सचिन गायकवाड, अमोल गायकवाड, सुनील गायकवाड, अजित गायकवाड, संतोष जगताप, संतोष गायकवाड, दत्तात्रय गायकवाड व सर्व सदस्य, ग्रामस्थ यांचे योगदान मोठे आहे. हरित परिवाराच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.